Monday 10 April 2023

अपेक्षा !!!


 अपेक्षा , अपेक्षा  आणि फक्त अपेक्षा 


"अपेक्षा " अहो कुणी मुलगी नाही. अपेक्षा म्हणजे आपलं ते हे, सोप्या इंग्रजी शब्दात सांगायचं तर Expectations. हुश्श$ बरं झाल इंग्रजाळलेला शब्द आठवला, नाहीतरी सध्या मराठीची बोंबाबोंबच आहे. असो!

"अपेक्षा " ह्या शब्दाचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाच स्थान आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. (आता तुम्ही म्हणाल, मी काहीही बरळते आहे. ठीक आहे विचारा स्वतःलाच) कारण आपल्याला(स्वतःला) सगळ्या गोष्टी नित्यनेमाने पार पाडायच्या असतात.  आता हे कोण ठरवत, आपल्या अपेक्षाच ना? समजा, एका दुसऱ्या दिवशी नाहीच घडलं आपल्या नियमाप्रमाणे/अपेक्षेप्रमाणे, मग आपण, अपेक्षाभंगाचं खापर फोडायला मोकळेच असतो. मग ती वेळ असो, आपले आई-बाबा, बहीण-भाऊ, ऑफिस मधला सहकारी किंवा कुठलीही वस्तू. 

उदाहरण द्यायचं झाल तर, आपण रोज ऑफिस मधे जातो एकाच उद्देशाने (खरचं उद्देश कि अपेक्षा) कि महिन्याच्या शेवटच्या तारखेला आपल्याला पगार मिळणार, ते पण कधी जेव्हा त्या मोबदल्यात काम केल्यावर (खरचं मोबदला कि ज्या ऑफिस मधे आपण काम करतो त्यांची आपल्याकडून असलेली अपेक्षा, इनफॅक्ट जरा जास्तच). मला तर असं वाटत अपेक्षा हे एक वर्तूळ आहे. आधी काहीतरी करा आणि त्या मोबदल्यात काही तरी मिळवा. त्या विरोधात काही नाही झालंच तर लेबल लावायला मोकळे "अपेक्षाभंग". 

कर्तव्य हा अपेक्षेविरुद्ध चा शब्द. जे मला वाटत फक्त आपले आई-बाबाच पूर्ण जबाबदारीने निभावतात(आजकाल मोजकेच). बाकी उरलेल्या नातेसंबंधांमधे कमी/ जास्त अपेक्षांशी यादी असतेच. मग तुम्ही कितीही कोणावर प्रेम करा अथवा न करा. अपेक्षेत उतरला नाहीत, तर ज्याच्या त्याच्या, ध्यानी-मनी एकच वाक्य असत "I didn't expected this from YOU" काही जण उघडपणे बोलून दाखवतात, तर काही गप्प राहतात.

मला मग प्रश्न पडतो, स्वतःला वाईट वाटेल किंवा दुःख होईल अशा अपेक्षा कराच का? त्यापेक्षा अपेक्षाच नको. पण मग अपेक्षा न करण हे देखील अपेक्षा करण्यासारखाच नाही का?

कोणाकडून किती आणि कुठल्या मर्यादे पर्यंत अपेक्षा ठेवायच्या आणि कोणाचा अपेक्षाभंग होऊ न द्यायचा, म्हणजे मी पण खूश आणि तू पण खूश. सगळीच गफलत आहे रावं! ह्या सगळ्याचा समतोल राखताना तारांबळ उडते, तुमचीही होत असेलच. त्यात नवीन असे काही नाही. सगळेच आपले आहेत त्यामुळे ज्या  गोष्टी अनपेक्षित पणे घडतात, त्याला सामोरे जाऊन, आपल्या नात्यात गोडवा निर्माण करणारे बरेच आहेत, त्यांना माझा सलाम !!!

Saturday 14 May 2016

ते वडाच झाड !!!


अशाच एका दिवशी ठरल, सगळी गँग मिळून कोकणची स्वारी करायची. कसलाही आराखडा न आखता कोणतीही पूर्वतयारी न करता वाट दिसेल तिथे सुटलो. कुठे येऊन पोहचलो हे आम्हाला ठाऊक नव्हते. घनदाट जंगल, पाऊस पडून सगळ कोकण छान हिरवगार झाल होत. तशी पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे कोणी थकल्याची भूणभूण  करत नव्हत. चालत चालत जंगलात आत पर्यत येऊन पोहचलो. त्या ठिकाणी काही पडिक अशी वास्तू दिसली. लांबून तसा फारसा अंदाज़ बांधता येत नव्हता. मग सगळ्यांच्या एकमताने धीर धरून आत गेलो. 


इतकी जुनी आणि प्रशस्त वास्तू बघून सर्वानी आ वासला. आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हे उंच उंच खांब बिना छप्पर असलेले. रानटी झाडे आणि फुलांनी ते खांब फारच मोहक दिसत होते. जणूकाही त्या झाड़ा फुलांनी खांबाला आलिंगण घातलय.
त्यामुळे खांबावरील मूळ नक्षीकाम एकतर शेवाळ किंवा झाडामुळे झाकोळलेली.



एक चौथरा सोडला, दुसऱ्या चौथऱ्यावर आलो. तिथे छोट्या मोठ्या उंचीचे खांब ठराविक अंतरावर उभे होते. त्या तिथे एक दोन नाही तर चक्क चार चौथरे होते. तिसऱ्या चौथ्या चौथऱ्यावर खास तस काहीच नव्हत, पण झाडांची संख्या कमी त्यामुळे निळशुभ्र आकाश आणि मधून सूर्याचे पडणारे कवडसे, खूप छान होत ते दृश्य! शेवटच्या चौथऱ्यावर एक जुन अस मोठ वडाच झाड़, भोवतालची बरीचशी मोकळी जागा सोडली तर चहूबाजूनी भिंती उभ्या होत्या. मोजक्याच अंतरावर एक खोल विहीर, पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे विहीर छान पाण्याने भरलेली आणि त्यावर पालापाचोळयाचा थर. अधून मधून फ़ोटो काढण चालूच होत, पण माझ मन त्या वडाच्या झाड़ातच होत.


आम्हाला त्या जागी येऊन आता संध्याकाळचे बरेच वाजले होते, मग पळता पाय काढला तेच दुसऱ्या दिवशी परत त्याच ठिकाणी यायच्या निर्णयाने. मला काही रात्रभर झोप लागली नाही. कधी सकाळ होते आणि मी त्या वडाच्या झाड़ापाशी जाते अस झाल. झाली एकदाची सकाळ सगळ्यांच्या आधी उठून जाण्यास एकदम तयार. त्यात आज पहाटेच ढग भरून आलेले त्यामुळे छत्री , रेनकोटच ओझ सोबतीला होत. झपझप पावल त्या वास्तूच्या दिशेनं निघाली आणि एकदाचे पोहचलो. मी पोहचले ते थेट त्या वडाच्या झाड़ापाशी आणि परत न्याहळत बसले. माझ मलाच कळत नव्हत काय एवढं ह्यात , का भारावून टाकलय?

निरीक्षण करत असताना पावसाला राहवल नाही, खूप मोठी सर आली. पाऊस जेमतेम १५-२० मिनिटे, पण जोरदार पडला. मी आणि माझे काही मित्र वडाच्या बुंध्याखाली आडोसा घेऊन उभे होतो. पावसाच्या पाण्याने वडाच्या झाडाभोवती डबकी साचली. पाण्याचे थेंब वडाच्या पारंब्यातून असे काही पडत होते, जस काही कोणी नाजूक पोर नहाणी घरातून नुकतीच केस धुवून बाहेर उभी आहे. नीरव शांततेत टपोरे थेंब साचलेल्या पाण्यात टप टप करत पडत होते आणि त्यातून होणारा तो मधूर आवाज, खूप मस्त वाटत होत.

ह्या प्रशस्त जागेत हे वडाच झाड अस इथे ह्या ठिकाणीच का आणि कोणी लावल असेल? हा विचार करता करता मी वेगवेगळ्या कोनातून त्या झाडाचे फ़ोटो काढू लागले. निरीक्षणानंतर अस कळल की एका बाजूला खूप खूप पारंब्या आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच कमी आणि आखूड़ कोणीतरी कापल्यासारख्या . पावसात ते झाड खरच न्हावून निघालेल. आधी म्हटल्याप्रमाणे अगदी नाजूक पोरीप्रमाणे, कोकणात जस घरात मागच्या अंगणात नहाणी घर असतं अगदी तसंच त्या वडाच्या झाडाच, म्हणून त्या भोवती चार भिंती आडोशाला, दिसणाऱ्याला दिसू नये आणि बघणाऱ्याने बघत बसावं.

मला काही केल्या तिथून पाय काढ़वत नव्हता. पण निघण भाग होत. पुन्हा एकदा ती वास्तू आणि मनात घर करुन गेलेल ते वडाच झाड घेऊन घराकडे निघालो.


[ता.क. : स्वप्नात आलेल वडाच हे झाड कोकणातलं , कारण सभोवतालच दृश्य हे कोकणातलच वाटत होत. बाकी लिहिलेल काल्पनिक आहे. पण आशा करते हे वडाच झाड मला नक्की दिसेल.]

--------
विनया ज. शिर्सेकर