Sunday, 18 December 2011

मुंबई - अलिबाग - मुंबई

खरच वाटत नाही! उद्या (१० डिसेंबर २०११) अलिबागला जायचं आहे. अगदी बोलण होत काय आणि मोजक्याच मित्र मंडळीकडून होकार मिळवून आठवड्याभरात सहलीला जायचं पक्क झालं.
ठरवल्याप्रमाणे (शेवटी भारतीय वेळेनुसारच आणि ह्या-त्या कारणांमुळे एक तास उशिराच) आम्ही सगळे सकाळी ७ च्या ठोक्याला गेट वे ऑफ इंडिया ला पोहचलो.
.साध्या बोटीच तिकीट काढून जिथून बोटी सुटतात तिथेच आजुबाजूच चित्र न्याहळत रांगेत उभे होतो. खरंच! सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात आपल्या मुंबापुरीच दार (गेट वे ऑफ इंडिया) आणि हॉटेल ताज किती सुंदर दिसत होत
ठरलेल्या वेळेतच आणि सह प्रवासाच्या "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल SSS " च्या गजरात आमची बोट गेटवेच्या किनाऱ्यापासून अलिप्त झाली. पुढे सरकत असताना आणि मागे वळून पाहताना काही क्षणातच मुंबईच चित्र धूसर होत होत दिसेनास झालं.

मग वेध लागले ते मांडावा किनारा गाठायचं. त्यात समुद्राची शांतता, खिन्न होवून बसलेले (अडकलेले) मोठी जहाज आम्हाला "खूप मज्जा करा!" असं सांगत असल्याचा भास आणि त्यात बेताल (ना सूर ना ताल) होवून गाणारे आमचे सहप्रवासी ह्या सगळ्याचा रसभंग करत होते.


ती जहाज नाहीशी होताच काही वेळातच पांढऱ्याशुभ्र समुद्र पक्ष्याचा थवा आमच्या बोटी मागून गिरक्या घेऊ लागला. काही प्रवासी (त्यात मी) त्याच्या कडचा खाऊ हवेत उडवून भरवण्याचा प्रयत्न करत होती. त्या पक्ष्याची तो खाऊ चोचीत पकडण्याची झुंबड चालू होती. खाण्याचा आणि भरवण्याचा हा खेळ बराच वेळ चालू होता. खेळ संपेपर्यंत आम्ही मांडावा बंदर कडे पोहचलो आणि पक्ष्यांनी आमचा निरोप घेतला (नक्कीच दुसऱ्या प्रवासांबरोबर खेळ खेळण्यासाठी.)

मांडवा बंदरावर उतरून आम्ही डुगडुग (सहाजण बसतील एवढी मोठी रिक्षा) पकडून डागडुग करत नागावच्या किनाऱ्यावर तासाभरातच पोहचलो. पोटपूजा करून माझे मित्र मंडळी पाण्यात मज्जा लुटण्यासाठी गेले आणि मी किनाऱ्यावर त्यांचे छायचित्र काढण्यात मौज करत होते.
शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे तशी वर्दळ किनाऱ्यावर होती. नेहमीप्रमाणे त्यातले काही जण पाण्याचा, काही जण क्रिकेट खेळण्याचा, तर काही जण घोडा गाडीत फिरण्याचा आस्वाद घेत होते.

समुद्र्याचा पाण्यात मज्जा लुटून, परत  ताजतवान होवून दुपारच्या जेवणात मस्त गरमा गरम भज्जी आणि वरण भातावर ताव  मारला.

जेवण झाल्यावर शतपावली करून डुगडूगीतून परत मांडावा बंदरावर सूर्यास्त होण्या आधी पोहचलो. आता पर्यंत बरेच सूर्यास्त पहिले त्यात अजून एक, डोळे दिपून टाकणारा सूर्यास्त!



एकीकडे सूर्य अस्ताला जात होता आणि दुसरीकडे चंद्र डोक्यावर होता. प्रदूषण विरहित वातावरणात चंद्र आणि तारे इतके विलक्षण दिसत होते ( त्या दिवशी पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र असल्यामुळे चंद्र जरा जास्तच मोठा असल्याचा भासत होता) हे सगळ दृश आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता.

हळू हळू पृथ्वी ने चंद्राला झाकोळायला सुरवात केली आणि चंद्राच्या त्या विविध कला क्षणाधार्त अनुभवल्या. ते पाहत असताना समुद्राच्या लाटांचा होणार संथ आवाज आणि निरभ्र काळोखी शांतता काही सांगत असल्याचा परत भास झाला.




असं, हे दिवसभराच आल्हाददायक आणि नयनरम्य निसर्गाच चित्र डोळ्यात साठवत आम्ही सगळेजण आपापल्या घरी परतलो......

------

विनया ज. शिर्सेकर

5 comments:

  1. अप्रतिम. खूपच छान अनुभव आहे आणि खूप छान शब्दांत मांडला आहेस. keep it up...

    ReplyDelete
  2. vinaya kay aahe he?? tu kadhi pasun evhada chan lihayla lagali!!!!! khupch mast aahe aasa vatat aahe ki tuzya ya lekhatun mich phirun aale...:)

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Atishay sundar Vini, madhuri exactly said vachatana vatal sobat aamhi pan aahot tuzya :-). superlike it.

    ReplyDelete
  5. Very Nice ...Keep it up ..:-)

    ReplyDelete