Monday, 10 April 2023

अपेक्षा !!!


 अपेक्षा , अपेक्षा  आणि फक्त अपेक्षा 


"अपेक्षा " अहो कुणी मुलगी नाही. अपेक्षा म्हणजे आपलं ते हे, सोप्या इंग्रजी शब्दात सांगायचं तर Expectations. हुश्श$ बरं झाल इंग्रजाळलेला शब्द आठवला, नाहीतरी सध्या मराठीची बोंबाबोंबच आहे. असो!

"अपेक्षा " ह्या शब्दाचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाच स्थान आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. (आता तुम्ही म्हणाल, मी काहीही बरळते आहे. ठीक आहे विचारा स्वतःलाच) कारण आपल्याला(स्वतःला) सगळ्या गोष्टी नित्यनेमाने पार पाडायच्या असतात.  आता हे कोण ठरवत, आपल्या अपेक्षाच ना? समजा, एका दुसऱ्या दिवशी नाहीच घडलं आपल्या नियमाप्रमाणे/अपेक्षेप्रमाणे, मग आपण, अपेक्षाभंगाचं खापर फोडायला मोकळेच असतो. मग ती वेळ असो, आपले आई-बाबा, बहीण-भाऊ, ऑफिस मधला सहकारी किंवा कुठलीही वस्तू. 

उदाहरण द्यायचं झाल तर, आपण रोज ऑफिस मधे जातो एकाच उद्देशाने (खरचं उद्देश कि अपेक्षा) कि महिन्याच्या शेवटच्या तारखेला आपल्याला पगार मिळणार, ते पण कधी जेव्हा त्या मोबदल्यात काम केल्यावर (खरचं मोबदला कि ज्या ऑफिस मधे आपण काम करतो त्यांची आपल्याकडून असलेली अपेक्षा, इनफॅक्ट जरा जास्तच). मला तर असं वाटत अपेक्षा हे एक वर्तूळ आहे. आधी काहीतरी करा आणि त्या मोबदल्यात काही तरी मिळवा. त्या विरोधात काही नाही झालंच तर लेबल लावायला मोकळे "अपेक्षाभंग". 

कर्तव्य हा अपेक्षेविरुद्ध चा शब्द. जे मला वाटत फक्त आपले आई-बाबाच पूर्ण जबाबदारीने निभावतात(आजकाल मोजकेच). बाकी उरलेल्या नातेसंबंधांमधे कमी/ जास्त अपेक्षांशी यादी असतेच. मग तुम्ही कितीही कोणावर प्रेम करा अथवा न करा. अपेक्षेत उतरला नाहीत, तर ज्याच्या त्याच्या, ध्यानी-मनी एकच वाक्य असत "I didn't expected this from YOU" काही जण उघडपणे बोलून दाखवतात, तर काही गप्प राहतात.

मला मग प्रश्न पडतो, स्वतःला वाईट वाटेल किंवा दुःख होईल अशा अपेक्षा कराच का? त्यापेक्षा अपेक्षाच नको. पण मग अपेक्षा न करण हे देखील अपेक्षा करण्यासारखाच नाही का?

कोणाकडून किती आणि कुठल्या मर्यादे पर्यंत अपेक्षा ठेवायच्या आणि कोणाचा अपेक्षाभंग होऊ न द्यायचा, म्हणजे मी पण खूश आणि तू पण खूश. सगळीच गफलत आहे रावं! ह्या सगळ्याचा समतोल राखताना तारांबळ उडते, तुमचीही होत असेलच. त्यात नवीन असे काही नाही. सगळेच आपले आहेत त्यामुळे ज्या  गोष्टी अनपेक्षित पणे घडतात, त्याला सामोरे जाऊन, आपल्या नात्यात गोडवा निर्माण करणारे बरेच आहेत, त्यांना माझा सलाम !!!

Saturday, 14 May 2016

ते वडाच झाड !!!


अशाच एका दिवशी ठरल, सगळी गँग मिळून कोकणची स्वारी करायची. कसलाही आराखडा न आखता कोणतीही पूर्वतयारी न करता वाट दिसेल तिथे सुटलो. कुठे येऊन पोहचलो हे आम्हाला ठाऊक नव्हते. घनदाट जंगल, पाऊस पडून सगळ कोकण छान हिरवगार झाल होत. तशी पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे कोणी थकल्याची भूणभूण  करत नव्हत. चालत चालत जंगलात आत पर्यत येऊन पोहचलो. त्या ठिकाणी काही पडिक अशी वास्तू दिसली. लांबून तसा फारसा अंदाज़ बांधता येत नव्हता. मग सगळ्यांच्या एकमताने धीर धरून आत गेलो. 


इतकी जुनी आणि प्रशस्त वास्तू बघून सर्वानी आ वासला. आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हे उंच उंच खांब बिना छप्पर असलेले. रानटी झाडे आणि फुलांनी ते खांब फारच मोहक दिसत होते. जणूकाही त्या झाड़ा फुलांनी खांबाला आलिंगण घातलय.
त्यामुळे खांबावरील मूळ नक्षीकाम एकतर शेवाळ किंवा झाडामुळे झाकोळलेली.



एक चौथरा सोडला, दुसऱ्या चौथऱ्यावर आलो. तिथे छोट्या मोठ्या उंचीचे खांब ठराविक अंतरावर उभे होते. त्या तिथे एक दोन नाही तर चक्क चार चौथरे होते. तिसऱ्या चौथ्या चौथऱ्यावर खास तस काहीच नव्हत, पण झाडांची संख्या कमी त्यामुळे निळशुभ्र आकाश आणि मधून सूर्याचे पडणारे कवडसे, खूप छान होत ते दृश्य! शेवटच्या चौथऱ्यावर एक जुन अस मोठ वडाच झाड़, भोवतालची बरीचशी मोकळी जागा सोडली तर चहूबाजूनी भिंती उभ्या होत्या. मोजक्याच अंतरावर एक खोल विहीर, पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे विहीर छान पाण्याने भरलेली आणि त्यावर पालापाचोळयाचा थर. अधून मधून फ़ोटो काढण चालूच होत, पण माझ मन त्या वडाच्या झाड़ातच होत.


आम्हाला त्या जागी येऊन आता संध्याकाळचे बरेच वाजले होते, मग पळता पाय काढला तेच दुसऱ्या दिवशी परत त्याच ठिकाणी यायच्या निर्णयाने. मला काही रात्रभर झोप लागली नाही. कधी सकाळ होते आणि मी त्या वडाच्या झाड़ापाशी जाते अस झाल. झाली एकदाची सकाळ सगळ्यांच्या आधी उठून जाण्यास एकदम तयार. त्यात आज पहाटेच ढग भरून आलेले त्यामुळे छत्री , रेनकोटच ओझ सोबतीला होत. झपझप पावल त्या वास्तूच्या दिशेनं निघाली आणि एकदाचे पोहचलो. मी पोहचले ते थेट त्या वडाच्या झाड़ापाशी आणि परत न्याहळत बसले. माझ मलाच कळत नव्हत काय एवढं ह्यात , का भारावून टाकलय?

निरीक्षण करत असताना पावसाला राहवल नाही, खूप मोठी सर आली. पाऊस जेमतेम १५-२० मिनिटे, पण जोरदार पडला. मी आणि माझे काही मित्र वडाच्या बुंध्याखाली आडोसा घेऊन उभे होतो. पावसाच्या पाण्याने वडाच्या झाडाभोवती डबकी साचली. पाण्याचे थेंब वडाच्या पारंब्यातून असे काही पडत होते, जस काही कोणी नाजूक पोर नहाणी घरातून नुकतीच केस धुवून बाहेर उभी आहे. नीरव शांततेत टपोरे थेंब साचलेल्या पाण्यात टप टप करत पडत होते आणि त्यातून होणारा तो मधूर आवाज, खूप मस्त वाटत होत.

ह्या प्रशस्त जागेत हे वडाच झाड अस इथे ह्या ठिकाणीच का आणि कोणी लावल असेल? हा विचार करता करता मी वेगवेगळ्या कोनातून त्या झाडाचे फ़ोटो काढू लागले. निरीक्षणानंतर अस कळल की एका बाजूला खूप खूप पारंब्या आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच कमी आणि आखूड़ कोणीतरी कापल्यासारख्या . पावसात ते झाड खरच न्हावून निघालेल. आधी म्हटल्याप्रमाणे अगदी नाजूक पोरीप्रमाणे, कोकणात जस घरात मागच्या अंगणात नहाणी घर असतं अगदी तसंच त्या वडाच्या झाडाच, म्हणून त्या भोवती चार भिंती आडोशाला, दिसणाऱ्याला दिसू नये आणि बघणाऱ्याने बघत बसावं.

मला काही केल्या तिथून पाय काढ़वत नव्हता. पण निघण भाग होत. पुन्हा एकदा ती वास्तू आणि मनात घर करुन गेलेल ते वडाच झाड घेऊन घराकडे निघालो.


[ता.क. : स्वप्नात आलेल वडाच हे झाड कोकणातलं , कारण सभोवतालच दृश्य हे कोकणातलच वाटत होत. बाकी लिहिलेल काल्पनिक आहे. पण आशा करते हे वडाच झाड मला नक्की दिसेल.]

--------
विनया ज. शिर्सेकर

वाट चुकलेली काही मिनिटे ...

अशीच कोणीतरी एक 'ती' आणि तिला आवडणारा 'तो'. तिला नेहमी वाटत फोन करुन त्याच्याशी बोलाव. प्रत्यक्षात तिला कधी ते जमलच नाही. अचानक एक दिवस आईचा निरोप मावशीच्या मुलाला देण्यासाठी ती फोन करते अणि नेमका फोन त्याला लागतो. घटकेभरचा त्या दोघांचा संवाद !!!



ती : (विचारपूस न करता) अरे तू आहेस कुठे?
मावशीला सांग आई आज घरी येणार आहे.
तो : हेल्लो !!
ती : (समोरचा आवाज ऐकून काही सेकंद स्तब्ध. कानाला लावलेला फोन बाजूला काढून पाहिला तर फ़ोन त्याला लागला होता. भानावर आल्यावर बोलायला सुरुवात केली. पण ह्या वेळेस आवाज थोडा दबलेला.) हे हेल्लो I am sorry! तुला चुकून फ़ोन लागला. बर तू कसा आहेस?
तो: मी मजेत, तू कशी आहेस?
ती: काही ख़ास नाही. रोजच्या सारख. कधी छान कधी कंटाळवाण आणि overall ok!.
विचारपूस झाली आता पुढे काय बोलाव दोघांना पण कळेना. एक मोठी शांतता.
हिम्मत करून तीच बोलली.
ती: एक विचारू ?
तो: हो विचार ना, त्यात विचारायचा काय?
ती: नाही नको आपण भेटू तेव्हा बोलू. मग कधी भेटतोय आपण?
तो: हो भेटूयात ना लवकरच. नक्की
ती: (नेहमीच वाक्य ऐकल्यावर परत भानावर आली) ठीक आहे. चल तर फ़ोन ठेवते. काळजी घे.

संभाषण तर इथेच संपल, पण
अजूनही हरवलेल्या वाटेवर ती रस्ता शोधतेय.


मिळेल तिला वाट???

-----

विनया ज. शिर्सेकर 

Tuesday, 18 November 2014

Email : अच्युत गोडबोले

नमस्कार मुसाफिर,

मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना (जवळ जवळ सात-आठ वर्षापूर्वी) तुमची मुलाखत ( सह्याद्रि वाहिनीवर) ऐकल्या नंतर ईमेल करण्याच ठरवल होत. पण काही कारणास्तव ते राहून गेल आणि ती संधी तुमच्या मुसाफिरीच्या निमित्ताने जुळून आली.

अफाट, अचाट, अरभाट, अतुलनीय... आणि अजून बरच काही जे शब्दात मांडता येणार. तुमच्यावर कौतुकांचा वर्षाव चालूच आहे आणि तो असाच चालू राहणार यात काही शंकाच नाही. मोठमोठ्या मंडळीनी पोचपावती दिल्यानंतर मी ते अजून काय बोलावं  आणि काय लिहावं. तरीसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद सर!

मुसाफिरितला एक एक टप्पा उलटताना तुम्ही नव्याने उलगडत गेलात आणि एक मोठ यान सापडल ते म्हणजे 'अच्युतयान'.

तुमचा बराचसा (आणीबाणीचा) काळ हा मुंबईतलाच. मी स्वतः मुंबईत राहणारी. त्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरी ते कामाठीपुरा आणि गिरणगाव ते माहिम इथल्या सगळ्या गल्ल्या तुमच्या लिखित अनुभवा बरोबर परत फिरले आणि काही ठिकाणी डोळे पाणावले.

समुद्राच्या लाटांप्रमाणे उंच उसळून उत्तुंग उंची गाठून सुद्धा तुम्ही तितकेच नम्र! तुमचा नम्रपणा मी अगदी जवळून अनुभवला आहे. ते चतुरंगच्या एका कार्यक्रमा निमित्ताने (सत्यजीत दुबे जीवन गौरव पुरस्कार , स्वामी नारायण मंदिर, दादर). तुम्हाला live ऐकण्याचा आनंद तर होताच, पण गडबडित तुमची सही माझ्या autograph book मध्ये घ्यायच राहूनच गेलत्याच अजूनही राहून राहून वाईट वाटतय. तो योग पुन्हा येईल अशी आशा करते.

खरतर मी तुम्हाला IT तज्ञ म्हणूनच ओळखत होते. पण तुमचा एकंदरित प्रवास पाहता तुम्ही खरच एक अफलातून आहात.

माणूस अस्वस्थ झाला की तो काय काय करू शकतो हे तुमच्याकड़े पाहून कळत. तुमचे परत एकदा खूप खूप धन्यवाद (मुसाफिरिसाठी). तुमची ही मुसाफिरी अशीच अखंड चालू राहो त्यासाठी खूप खूप सदिच्छा!!!

--------
विनया ज. शिर्सेकर


Saturday, 28 January 2012

निरोपसमारंभ "BCA Department".....


कॉलेज म्हटलं  कि  फक्त  मस्ती, धमाल, दंगा आणि  थोडासा(च) अभ्यास. सगळ्यांना वाटत  फक्त मुला -मुलींच्या कॉलेज मध्येच मज्जा  करता  येते. मी  आणि  माझ्या  काही  मैत्रिणी  ह्याला  अपवाद  आहोत. आता मज्जा  करायची झाली तर  ती  कशीही, कधीही  कोणत्या हि मित्र मैत्रिणी बरोबर करता  येते. मग  त्या  साठी कॉलेज मुलींचं  असो  किंवा  मुलांच असो, अस काही सक्तीच  नाही. प्रत्येक  जणांची  मज्जा  करायची पद्धत हि  त्यांच्याप्रमाणे वेगळीच असते. अशी हि मज्जा  करता  करता  मग  एक  दिवस  सर्वांसाठी येतो, तो म्हणजे एकमेकांपासून दूर जाण्याचा आणि निरोप घेण्याचा.
BCA[Bachelor in Computer Application] च्या  निरोप  समारंभावेळी  आम्ही  मुलींनी काही सिनेमांच्या  गाण्यांवर  विडंबन  करून /गाऊन, आमच्या  लाडक्या  "BCA Department" चा [हसत/रडत] निरोप घेतला. ह्या  गाण्यावरून  एकंदरीत तुम्हाला  कळेलच, मुलींच्या कॉलेज मध्येसुद्धा  किती  मज्जा  करता  येते. विडंबन  केलेली  गाणी  हि  खालील  प्रमाणे.

खान  सर  [HOD]: 
"BCA"  ची  शान  आणि  जान  म्हणजे  HOD “खान सर”. नेहमीच  ऐटीत  असणारे.
मूळ गाण:  खुद  को  क्या  समझती है.. [अक्षय कुमारच्या खिलाडी चित्रपटातलं]

खुद  को  क्या  समझते  है,
इतना  Style  मारते  है,
रम  पम  रम  पम पम… (2)
कॉलेज  मे  नये  नये, रंग  के  shirt डालते है, ..
ओ यारो  ये  हमे .. लगते है  दोस्त  हि,
लेकीन  वो  है  HOD !!
खुद  को  राजधानी  समजते  है,
इतना  fast बोलते  है,
उर्दू  के  नये  नये  अक्षर  वो  लिखते  है, 
अगर  हम  ये  कहे,लिखो  तुम  बडा,
वो  बोले  लगाओ  चष्मा !!  
अब्दुल  सर :
आम्हाला  C++, VB आणि  कॉम्पुटरच्या  संबधित  विविध  भाषांचे  धडे  घ्यायचे. सगळे जण त्यांना    “CODE Guru” म्हणायचे.त्यांना  वेळ  वाया  घालवायला  अजिबात  आवडत  नसे. खर  सांगयचं तर  तेव्हा  ते  खूप  खडूस  होते. त्यांच्या  साठी  लिहिलेलं  हे  गाण.
मूळ  गाण: क्यू  आज  कल  नींद  कम  ख्वाब  ज्यादा है.. [ Gangster चित्रपटातलं]

                              क्यू  आज  कल  नींद  कम  प्रोजेक्ट  ज्यादा  है ..
                              लगता सताने का  पुरा  पुरा  इरादा  है ..
                              क्या  ये  Tension है ,  या … 
                              या  फिर  ये  Pressure है , अब्दुल  सर  का ,
                             ओ  ओ हो  sss ये  अब्दुल  सर  है..
                             ओ  हो  sss हमारे  ये  क्लास  Teacher  है,
                             हमको  कभी  भी  वो   तो,
                             Time Pass करने 
नही देते,
                             जब  भी  उन्हे  हम  देखे,
                             Project Project हि  करते,
                           
ओ  ओ हो  sss ये  अब्दुल  सर  है..
                           ओ  हो  sss हमारे  ये  क्लास  Teacher  है !!!





मोनिका Madam:
"BCA Department" च्या अप्सराच. अजूनही  त्या  तितक्याच  सुंदर दिसतात. त्यांना पाहिलं कि दिवस पण अगदी मस्त जायचा. BCA च्या  पहिल्या  आणि  दुसऱ्या  वर्षाला  “Technical  Communication” चे  धडे  घ्यायच्या. एक तास संपला  कि दुसऱ्या तासाला त्यांना Presentation नेहमी  लागायचंच.  त्यामुळे  सगळ्यांची  फारच तारांबळ  उडायची. त्यांच्यासाठी  लिहिलेलं  हे  गाण.
मूळ गाण: ले  गई  ले  गई .. [दुल्हन हम ले जायेंगे चित्रपटातलं]

                      ले  गई  ले  गई 
                      ले  गई  ले  गई  ले  गई  ले  गई…. दिल  ले  गई
                             TC के  Lecture मे  वो  दिल  ले   गई..

                             अरे ऐसे  झटके  मार  मार  के 
                             Favorite  बन  गई.. Monika ma'am !!!




कविता  Madam:
 विडंबन  केलेल  गाणं वाचूनच  कळेल,  कि  त्या  आम्हाला  कुठला  विषय  शिकवायच्या.
मूळ गाण: पल पल [लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातलं]

पल पल  पल  पल  हर  पल  हर  पल
रहे वो  सोचती हर  पल  हर पल 
Lecture मे  भी  हो,
बस  मे  भी  हो
ट्रेन  मे  भी  हो,
सोचती  हर  एक  पल,
हसती है  वो  बच्चो  जैसे,
नाम  है  उनका  Poetry   
पल पल  पल  पल  हर  पल  हर  पल
पढाती  है  वो  Subtraction, Addition,

De Morgan’s Law, Addition Theorem,
Integration हो  या Derivation
सब  पढके हो  गये  है  हम  डम,
जैसे  बजे है  खाली  खाली  ड्रम,
पल पल  पल  पल  हर  पल  हर पल !!!
मंजोत  Madam:
सगळ्यात  कंटाळवाणा  विषय  म्हणजे  Software Engineering[SE]/System Software[SS]. ह्या विषयाचा तास म्हणजे [माझ्यासाठी/आमच्यासाठी] अंगाई  गीत असायचं .
मूळ  गाण: गोलमाल  गोलमाल  [गोलमाल  चित्रपटातलं शीर्षक गीत]

                गोलमाल  गोलमाल  झुमके  मे  है  गोलमाल  (2)
                हर  SS के  Lecture मे  आए,
                और  हम  को  वो  इतना  पकाए,
                Projector लगाते लगाते
                एक  Lecture खतम हो  जाए,.
                SS के  ppt देखते  हि, 
                हमारे  ये  होश  उड जाए 
                नींद  आए  क्लास  मे
                एक  पल  मे  सब  सो  जाए,
                
पढाती है  कमाल  कि 
                पर
  Portion है  Vast,
               गोलमाल  गोलमाल …. 


राजश्री  Madam:
BCA च्या  पहिल्या  वर्षी  आम्हाला  Accounts  हा  सक्तीचा  विषय  [आणि  ह्या  सारखे  इतर  अनेक] होता. त्यात  राजश्री  Madam देखील  अगदी  तितक्याच  सक्तीने  शिकवायच्या.

मूळ  गाण: है ना बोलो [अंदाज चित्रपटातलं]
                       है ना  बोलो  बोलो (2)
                       Journal और  Ledger से
                      Ledger और  TB से 
                     प्यार  है  प्यार  है
                     है  ना  बोलो  बोलो
                    Madam बोलो  बोलो..
                   (
TB: Trial Balance)

 

मंजरी Madam:
पहिल्या  वर्षी  C language,दुसऱ्या वर्षी  COA/Microprosessor आणि  शेवटच्या  वर्षी  MIS… हुश्श.
बाकी  गाण्यावरून  सगळ  कळेलच.
मूळ  गाण : छोटे  छोटे  शहरो से [बंटी  और  बबली  चित्रपटातलं]

                         लंबे  लंबे  क्लासेस मे, खाली  बोर  Lectures से,
                         हम  तो  झोला  उठा के  चले,
                        Lecture कम  कम  होते  है,
                       Viva’s बहुत  से  होते  है,
                        हम   Assignment देके  पक गए,
                       ओ  हो …sss
                       पक  गए  पक  गए  हम  तो  पक  गए,
                      थक गए  थक  गए  हम  तो  थक  गए,
                       धडक  धडक
                       MIS पढाये  रे,
                       धडक  धडक
                       Xerox कराये रे...


उषा  Madam:

ह्यांना  कधीच  कोणी  नावाने  बोलवायचे  नाहीत. "Personality Development" चे  धडे  घ्यायच्या. थोडक्यात  सगळ्यांना  [आणि  इतर  अनेक  lecture  चा ] कंटाळा  यायचा. म्हणून  त्यांना  "PD Madam" म्हणूनच  ओळखायचे. 

मूळ  गाण: जिने  के  है  चार  दिन ... [मुझसे  शादी  करोगे  चित्रपटातलं]

                      हफ्ते  के  छ  दिन  ओ sss
                      आती  है  वो  एक  दिन  ओ sss
                      आए  आए  (2)
                      एक  बार जो  आए 
                     वो  क्लास  मे  सबको  बिठाये है  है..
                     Lecture मे  सबको 
पढाये  है  है..
                     Personality sabki बढाये ...


भावना  Madam:
ह्यांच्यासाठी  दोन  गाणी  विडंबन  करण्यात  आली  होती. कारण  त्या  आम्हाला  बालवाडीत  असलेल्या  मुलांसारख  शिकवायच्या.
1.मूळ  गाण: सावन का महिना पवन करे सोर[ मिलन चित्रपटातलं ]
                      Teachar Teacher अब  हम  नही  करेंगे सोर,
                       [सोर  नही  रे  बाबा  शोर]
                       Teachar Teacher अब  हम  नही  करेगे  शोर,
                      लेकीन  बच्चे  ना  हसे  तो  हो  जायेंगे  बोर …


2. मूळ  गाण : आओ  सुनाये  प्यार  कि  एक  कहाणी  [क्रिश चित्रपटातलं]
                    आओ  सुने  हम  ERP कि  कहाणी … ओ  हो sss,
                    एक  थे  सर, अब  आई  है  एक  राणी … ओ हो sss
                    नही  हस
ने वो  देती,  
                    नही  वो  बोल
ने वो  देती,
                    बच्चो  जैसे  हमको  वो 
समझाती
ओ  हो, 
                   आओ  सुनाये  हम  ERP कि  कहाणी … ओ  हो sss



सीमा  Madam:
जेमतेम  काही  महिन्यांसाठी आम्हाला  त्या  JAVA विषय  शिकवायला होत्या.
मूळ  गाण: धीरे धीरे  से [आशिकी चित्रपटातलं]

                     धीरे  धीरे  से  Board को  रब करना,
                     धीरे  धीरे  से  Program Dictate करना,
                     Dictate करके  हमको  Confuse करना,
                     ये  JAVA क्या  है  हमको  बताना…
                    (फिर  मर JAVA मिट JAVA हो  जाना :/ )



कमलप्रीत Madam:

ह्या  म्हणजे  एक  वेगळ  कोडच होत्या. BCA च्या  पहिल्या  आणि  दुसऱ्या वर्षी  होत्या, नंतर  मग  BCA Department ला राम राम  ठोकून  दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकवायला  गेल्या. त्यामुळे  आम्हाला  फार  दु:ख  झाल होत.
 

मूळ  गाण: चली चली  फिर  हवा  चली  [बागबान  चित्रपटातलं]

               गई गई  वो  गई  गई,
               हमे  छोड  के  चली  गई,
               taa taa [Music]
               
गई गई  वो  गई  गई,
               हमे  छोड  के  चली  गई,
              
FS और  DSN वो  पढाके, 
               हमे  छोड  के  चली  गई,
               चली  गई  वो  चली  गई
हमे  छोड  के  चली  गई,

                taa taa [Music]
              (FS
: File  Structure & DSN: Distributed System & Networking )



लक्ष्मी Madam:
German शिकवणाऱ्या [नावडत्या] madam.

मूळ  गाण: किताबे  बहुत  सी  पढी होगी तुमने... [बाजीगर  चित्रपटातलं]
              Languages बहुत  सी  पढी  होगी तुमने 
              मगर  क्या  ये  German भी  तुमने  पढा है,
                  पढाया है  हमको Laxmi madam ने  पढाया,
              बता German Dictionary मे  क्या  क्या  लिखा  है, 
              Ich bin Ich bin Ich bin Ich bin,
              Ich bin Ich bin Ich bin Ich bin,


काही  प्राध्यापक  असे  होते  कि  BCA Department मध्ये होत्या, पण  त्यांनी  आम्हाला  कधीच  शिकवलं नाही. कॉलेजचे इतर  कार्यक्रम  आणि  सहली  त्यामुळे  त्यांच्याशी  तितका  काही  तो  संवाद[मस्ती] होत असे. त्यातल्याच  ह्या  दोन  प्राध्यापिका.

प्राजक्ता  Madam:
 

मूळ  गाण : दिल  है  छोटासा  छोटीशी  आशा  [रोजा   चित्रपटातलं]

             छोटी  सी  टिकली
             छोटी  सी  Teacher
            दिल  कि  अच्छी  है,
            लगती बच्ची  है,
            Lecture नही  लेती, 
            कैसी  है Teacher
            छोटी 
सी  टिकली
            छोटी  सी  Teacher

            ट्रेन  से  आती  है, 
            रहती  डोंबिवली,
            taxi  वो  लेके,
            लिफ्ट  वो  देती,
            आदिती  कि  Mummy   
            प्राजक्ता  madam है,
            लेकीन  वो  lecture  लेती  नही है,
            छोटी  सी  टिकली ....


अजून  एक  गाण  त्यांच्यासाठी:
मूळ  गाण : आती  नही [ प्रेम चित्रपटातलं ]
            आती  नही  आती  नही
            कॉलेज  मे  है  मगर
            क्लास  मे  आती  नही, पढाती  नही…  




गार्गी  Madam:
मूळ गाण: फुलो सा चेहरा  तेरा [ अनाडी  चित्रपटातलं]
             Strawberry सा चेहरा तेरा
             BCA कि  तू  शान  है,
            रंग  तेरा  देख  के  रूप  तेरा  देख  के, 
            हम  [TY] भी  हैराण  है ...

हे  सगळ  झाल आमच्या  प्रध्यापाकांबद्दल.  त्यांना  सगळ्यांना  वाटायचं कि,  आम्ही  TY च्या  वर्गात  आल्यानंतर  जरा  जास्तच  शेफारलो होतो. त्याचं  हि  बरोबरच  होत. आम्ही  हि  प्रत्येकजण चाचणी  परीक्षा [Unit test], तोंडी  परीक्षा [Viva] किंवा  Assignment द्यायच्या  वेळेस  सतत  ते  पुढे कस  ढकलता  येईल,  त्या  साठी  नेहमी  प्रयत्न करायचो. काही  अपवाद  वगळता  हे  आमच्यासाठी  रोजचंच झाल  होत. त्यामुळे  ती  आमची  एक  प्रतिज्ञा होती. लिहिलेलं  हे गाण म्हणजे  आमची  प्रतिज्ञा [TY Pledge]

 मूळ गाण: हमसे  ही  जमाना  सारा [चुरा लिया ही तुमने चित्रपटातलं]

              हमसे  ही  BCA सारा,
              हम  किसी  से  कम  नही, 
             Test Postpond करने  मे,

              Expert तो  है  हम  सभी,
              Ty’s are BEST
              जान
  लो , बात  ये  मान  लो,
             तीर  रपा रप … 
तीर  रपा रप … रे sss ..

त्याचप्रमाणे  TY  संपल  कि  सगळ्यांना  ओढ  लागणार  होती  ती,  IT कंपनी मध्ये जाऊन  काम  करण्याची, पण  त्या  आधी  Project साठीच  Tension . हे  गाण  त्यासाठीच  तयार  केलेलं होत.



मूळ  गाण: नही समझे है  वो  हमे… [जो  जीता  वही  सिकंदर  चित्रपटातलं]

                 नही  समझे  है  वो  हमे, तो  क्या  जाता  है .. ला
लाला ss
                हारी बाजी  को  जितना  हमे  आता  है …
लालाला sss
                निकलेंगे BCA से  जब हम  जूम के 
                 Industries जूमेंगे  ये  कदम  चूम  के 
                 जो  सब  करते  है  यारो  वो  तुम  हम  क्यू  करे,
                 यु  प्रोजेक्ट  करते  करते  काहे  को  हम  मरे,
                 खान  सर  से  अब्दुल  सर  से भला  हम  क्यू  डरे
                यहा  के  हम  सिंकंदर  चाहे  तो  रख  ले 
                सबको  अपनी  जेब  के अंदर
                अरे  हम  से  पंगा  मत  ले  मेरी  जान …



सगळी  गाणी  वाचून  [गाऊन] झाल्यानंतर  तुम्हाला  कळलंच असेल  कि  आमचं“BCA Department” ची  शान  काही  औरच  आहे.[नक्कीच  तुम्हाला  पण  तुमच्या  कॉलेजचे दिवस  आठवले  असतीलच] आमचे  सगळे  प्राध्यापक  जरी  मस्ती  करत  असले, तरी  प्रत्येक  जण तितक्याच  कडक  शिस्तीचे  होते(आहेत). त्यांनी  दिलेल्या  प्रत्येक  शिकवणीमुळे आणि  चुका  झाल्यानंतर  तितक्याच  प्रेमळपणे आणि कठोरपणे ओरडल्यामुळेच आम्ही घडलो.

आमच्या  BCA च्या  सर्व  प्राध्यापकांना  हेच  सांगयचं आहे. आम्ही  पहिले  किंवा  शेवटचे  BCA Department [Degree मिळवून] मधून  बाहेर  निघणारे  नाहीत . आमच्या  आधी  चांगल्या  विद्यार्थिनी घडल्या   आणि  आमच्या  नंतर  हि  छान  विद्यार्थिनी  घडणार  आहेत [घडवत आहात]. त्यासाठी  आमच्या(माझ्या) ह्या  "BCA Department"  ला उदंड  आयुष्य लाभो.

अशा  ह्या  आमच्या  सर्व  अदाकार, कलाकार  तसेच  आमच्यावर  जीवापाड  प्रेम  करणाऱ्या  BCA च्या  सर्व  प्राध्यापकांना खूप  खूप  धन्यवाद  देऊन , शेवटी  अन्नू  मल्लिक ने  गायलेलं हे  गाण त्यांच्यासाठीच.

             कसम ये  ली  हमने ,
             कसम  न  तोडेंगे,
             we love you all of you
             तुम्हे  सतायेंगे
             जा  कसम  जाने  जा
             हम  को  तुम  से  प्यार
             we love you all of you
             तुम्हे  सतायेंगे …




ह्यांच्यामुळे आमच्या  वर्गातही  विविधतेत  एकता  होती. त्यामुळे  BCA तल्या माझ्या  प्रत्येक वर्गमैत्रीणीना सुद्धा खूप  खूप  धन्यवाद !!!

Three cheers for (Our) BCA Department … hip hip hurray… !!!



----
विनया ज. शिर्सेकर.

Friday, 27 January 2012

पुढच्या जन्मात ….


तसा माझा  पुनर्जन्मावर अजिबात  विश्वास  नाही. पण  एकदा अशीच विचार  करत  बसले असताना मला  काहीस सुचलेलं…  

पुढच्या  जन्मात  मला  आभाळ  ह्वायचं.
कारण 
मला वरून  सगळ  जग  पाहाचय !!

पुढच्या  जन्मात  मला  अथांग  समुद्र
ह्वायचं
कारण  मला  समुद्रातल्या  चिमुकल्या  माशांची  खेळायचं !!

पुढच्या  जन्मात  मला  सूर्य
ह्वायचं
सकाळी  उजाडून  संध्याकाळी  गुडूप ह्वायचं !!

पुढच्या  जन्मात  मला  पाऊस ह्वायचं
मस्त  पैकी  गरजायचं आणि  बरसायचं !!

पुढच्या  जन्मात  मला  वारा  
ह्वायचं
कारण  मला  सैरभैर  इथे  तिथे  पळायचं !!

पुढच्या  जन्मात  मला  सूर , ताल , लय
ह्वायचं
कारण  मला  छान  अशी   संगीत  मैफल  ह्वायचं !! 

पुढच्या  जन्मात  मला  असंच काहीतरी  भन्नाट ह्वायचं
पण  मनुष्य म्हणून  परत  जन्माला  नाही  यायचं ….पण  मनुष्य म्हणून  परत  जन्माला  नाही  यायचं ….




-----
विनया ज. शिर्सेकर

Sunday, 15 January 2012

थोर होते ते, त्यांना इतिहास जमा करू नका!

इ. स. ३ जानेवारी, १८३१ ला सावित्रीबाई यांचा जन्मदिवस. त्या दिवसाला स्त्री मुक्तिदिन म्हणून  ओळखलं  जात. १ जानेवारी, १८४८ साली सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी भारतात महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली.

अहो घाबरू नका, मी मूल्य शिक्षणाचा तास घेत नाही. माझ्या काही मैत्रिणी आणि इतर बरेच जण विसरभोळे झाले आहेत. त्यांना ह्या थोरांची आठवण करून द्यावीशी वाटली इतकच.






सावित्रीबाईचे आभार मानावे तितके थोडेच.त्यांच्या बद्दल लिहावास वाटल त्याला दोन कारणे आहेत.

पहिल  कारण  म्हणजे दोन वर्षापूर्वीची गोष्ट(MCA च्या दुसऱ्या वर्षी). आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयात मी आणि माझी एक वर्गमैत्रीण काही कामा निम्मत गेलो होतो. (आजही सरकारी आणि काही   निमसरकारी कार्यालयात भिंतीवरती तुम्हाला लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी आणि इतर काही थोर मंडळींचे छायाचित्र टांगलेली दिसतील) तसच काहीस चित्र आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयाच (त्यात सावित्रीबाई याचं हि छायचित्र). आमच्या कामाला थोडा उशीर होणार होता, त्यामुळे तिथे थांबण भाग होत. मग टंगळ मंगळ करत ते कार्यालय निरखत होतो. त्यावर ती (माझी वर्गमैत्रीण) सावित्रीबाईच्या छायाचित्राकडे इशारा करत मला विचारते."ह्या कोण ?". सुरवातीला मला वाटल चेष्टा करत असेल. चपापून मी एक दोन प्रश्न विचारल्यावर कळल, तिला  खरच माहिती नव्हती. आता ह्यावर तिला मी काय सांगाव हे खरच कळत नव्हत. थोडक्यातच तिला म्हटलं "ह्यांच्या मुळे आज आपण इथे आहोत." वर्गमैत्रीण असल्यामुळे फारस झापल नाही (नाहीतर पूर्ण इतिहासाचा तास घेण्याची माझी तयारी होती.) वाटल नक्कीच तिला इतिहास नीट शिकवलं नसेल किंवा तिला इतिहासात रस नसेल.

दुसर कारण म्हणजे हल्लीचच अगदी ताज उदाहरण आहे. आमच्या परिसरातील एका शाळेत चक्क आठवड्यानंतर म्हणजे १० जानेवारीला सावित्रीबाईची जयंती साजरी केली. कारण काय तर ३ जानेवारीला ते विसरले. असे कसे काय विसरू शकतात हे लोक? शाळेतल्या शिक्षकांना जर सावित्रीबाई कोण, कुठल्या हे माहिती नसेल किंवा ह्याचा विसर पडला असेल, तर येणाऱ्या पिढीला विसर पडण साहजिकच आहे. (उशिरा का होईना त्यांना आठवण झाली म्हणून त्यांचे आभार)

आजच्या मुलींचे (Role model) आदर्श म्हणजे आजच्या सिने नट्या. जमानाच तसा आहे, जे दिसत तेच विकत. पण थोडा विचार केलात कि जाणवेल इतिहासात त्या वेळेला सावित्रीबाईनी महात्मा ज्योतिबांच्या सांगण्यावरून धाडस केल नसत, तर आजच्या ह्या सिने नट्या तुमच्यासाठी आदर्श ठरल्या असत्या का? किंवा तुम्ही/मी असे छान शिकून आत्मविश्वासने मोठमोठ्या (so called MNC) कार्यालयात किंवा अजून इतर क्षेत्रात  असे नाव कमवू शकलो असतो का? बघा जरा विचार करून आणि उत्तर शोधा. 

खंत वाटते, तुम्हा आम्हा सर्वाना ह्याचा विसर पडत चालला आहे. येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टीच काही कौतुक उरणार नाही. नेहमीच त्यांची आठवण काढा अस माझ म्हणण नाही. पण छायाचित्र  पाहून विचारू तरी नका हे कोण म्हणून? माझ फक्त एकच म्हणण आहे, सावित्रीबाई आणि त्यांच्या सारखेच इतर अनेक थोर मंडळींचा जरी इतिहास असला, तरी त्यांना इतिहास जमा करू नका.

ता.क. 
सावित्रीबाई बद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी नमूद केलेली पुस्तक वाचा(वेळ असेल तर). नाहीतर आता काय गुगल महाराज आहेतच.

१. "साध्वी  सावित्रीबाई  फुले" – फुलवंत  झोडगे, चिनार पब्लिकेशन , पुणे 
२. "त्या  होत्या  म्हणून" – डॉ. विजया  वाड, अनुश्री पब्लिकेशन


----
विनया ज. शिर्सेकर.  


Saturday, 14 January 2012

वैचारिक शब्दांशी पकडापकडी...


वाह, किती छान सुचलंय! 

पण छे आता माझ्याकडे लेखणी, कागद काहीच नाही. जेव्हा कधी लिहायचं ठरवते तर त्याच वेळेस सगळे विचार थांबलेले असतात. मग माझ्या समोर असतो तो फक्त असंख्य शब्दांचा पसारा. अशा ह्या  विखुरलेल्या शब्द संग्रहात कुठले शब्द वेचावे आणि कशापासून त्याच छान अस वाक्य बनवावं, ह्याच प्रयत्नांत असते. नेमक त्याच वेळेला सगळे शब्द माझ्यासमोर घेर धरून नाचायला लागतात. वेडावून खूप दूर पळून जातात. खरतर भांडावून सोडतात. अशी माझी आणि शब्दांची पकडा पकडी नेहमीच चालू असते. बऱ्याचदा धरपकडीचा खेळ मस्त जमून येतो. दमछाक होते आणि तितकीच मज्जा हि येते.


वाटत कि का कोणी अजून अस यंत्र बनवलं नाही, जेणेकरून डोक्यातल्या आणि मनातल्या विचारांची नोंद ठेवली जाईल. मग नोंद झालेले विचार सहजपणे वहीवर उतरतील.(हे मलाच नाही तर बऱ्याच जणांना वाटत असत)


मला तरी असल यंत्र अजून ठाऊक नाही. तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा!!!
----
विनया ज. शिर्सेकर


Saturday, 24 December 2011

ह्यांना सुचत(सुचलं) कसं???

वाह, किती सुंदर!!
खूप छान !!


मान  गये उस्ताद !!
लई भारी !!

कधीतरी खूप छान वाचताना तर कधी छान ऐकल कि ह्या अशा प्रतिक्रिया तुम्ही बऱ्याच वेळा दिल्या असतीलच. अशी वाहवा करून पुढचा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला पडला असेल (मला तो नेहमीच पडतो.)  कसं काय राव ह्यांना सुचत? आता हे "सुचण" पण काय भन्नाट कल्पना आहे ना ? पाहायला गेल तर तुम्हाला, मला बऱ्याच जणांना तस काही ना काही सुचतच असत. पण फार कमी जण असतात ज्यांना हे अगदी व्यवस्थित रित्या शब्द स्वरुपात किंवा अजून विविध ढंगाने दुसऱ्यांसमोर त्यांचे विचार मांडताही येतात.

आता उदाहरण द्यायचं झाल तर बरेच आहेत. एक दोन थोडक्यातच सांगते. पुल ची पुस्तक वाचताना(ऐकताना) अख्खी व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर येतात अन तितकंच निखळ हसवून जातात. त्या उलट वपु, त्याचं साहित्य वाचताना अगदी अंतर्मुख व्हायला लावतात. पाडगावकरांच्या कवितेची तर रीतच निराळी आणि ज्या प्रकारे ते सादर करतात ते आणखीनच निराळ. सध्या गाजत असलेली संदीप खरे - सलील कुलकर्णी च्या जोडीला तर तोडच नाही. कसं काय जमत बुवा ह्यांना अगदी मोजक्याच आणि सरळ शब्दात असे खोल विचार लिहायला.

आता पाडगावकरांबद्दल लिहील म्हणून त्यांचा एक किस्सा सांगते. अशीच एकदा त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. इथेच गिरगावात साहित्याला त्यांची मुलाखत आणि त्या जोडीला त्यांचा गाजलेल्या कवितेंची, गाण्यांची मैफल. असो! तर मुलाखत घेणाऱ्याने त्यांना नेहमी प्रमाणे प्रश्न विचारायला सुरवात केली आणि नेहमी तुम्हा आम्हाला (मला) पडलेला प्रश्न विचारला पाडगावकर साहेब तुम्हाला कविता लिहिण  कसं सुचत??
त्या वर ते गमतीने म्हणाले, आता हे सुचत कसं ते मलाही नाही माहित आणि जेव्हा सुचत तेव्हा ते आपसूकच बाहेर पडत. जे छान सुचलं त्याला परत तेव्ह्ढ्याच लकबीन सुंदर करून देणंही तितकंच गरजेच असत.

मुलाखतीवरून मला अजून एका व्यक्तीच नाव आवर्जून घ्यावस वाटत ते म्हणजे सुधीर गाडगीळ. चार चौघात मुलाखत घेताना त्यांना पुढचा प्रश्न काय विचारावा हे कसं सुचत? त्यांची मुलाखत म्हणजे एक वेगळी गप्पांची मेजवानीच होवून जाते.

हे झाल चांगल ऐकण्या आणि वाचण्या बाबत पण विज्ञानाच्या बाबतीत तेच आहे की, जर न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलच नसत, तर त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या शोधाबद्दल सुचलं असत का? हे अन ते अशी एक ना अनेक उदाहरणं  आहेत. ते सगळ सांगत बसले तर बरेच लांबेल. त्यातल्या त्यात पण थोडक्यात, चित्रपट बनवताना त्या दिग्दर्शकाला कसं चित्रीकरण कराव, कसं सुचत? चित्रकाराला चित्र काढायला कसं सुचत? लेखकाला लिहिण कसं सुचत? संशोधकाला संशोधन करायचं कसं सुचत? ..... न  संपणारे असे भलते सलते प्रश्न शेवटी एकच भला मोठा प्रश्न ह्यांना कसं सुचत?

आता ह्या दिग्गज लोकांबद्दल मी अजून काय बोलणार आणि काय लिहिणार त्यात मी लिहिण म्हणजे सूर्यासमोर ठिपकाच!! हे अस काहीतरी भन्नाट सुचत म्हणून का ते असामान्य आणि आपण सामान्य. हाच का तो त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक.

नेहमीच नाही पण आजूबाजूला थोडस निरखून पाहिलात कि नक्की जाणवेल. काही वेळेला जे मला सुचत नाही ते माझ्या मित्र मैत्रिणीला सुचत आणि मग ते माझ्या समोर उगीचच भाव खावून जातात.
आता हे सुचण म्हणजे आईने स्वयंपाकात रोजच्या प्रमाणे मीठ मसाला टाकण्या इतकच सोप आहे का?


शेवटी काय ज्याच त्याला सुचायच तेव्हाच सुचत. ते तुम्ही मी ठरवून नाही होत. हयात नसलेल्या दिग्गजांना बरच काही सुचलं आणि त्यांनी भरभरून दिल. जे आहेत त्यांना असच अजून भरपूर सुचू देत. जेणेकरून त्याचा आस्वाद आपण असाच घेत राहू.

खरंच,  ह्या सुचण्या मागे पण एक गंमत दडली आहे. पक्की खात्री आहे एवढ वाचून तुम्हाला पण काहीतरी सुचलंच असेल. अहो मग जरा डोक खाजवा कि राव!






आता जाता जाता मलाही हि काही सुचलय म्हणून...

"सुचण" मला पडलेलं भल मोठ कोड...
त्याची करता येत नाही फोड...
सुचलं कि वाटत फार गोड...
त्यासाठी करावी लागते विचारांची तड जोड...


 -----------
विनया ज. शिर्सेकर

Sunday, 18 December 2011

मुंबई - अलिबाग - मुंबई

खरच वाटत नाही! उद्या (१० डिसेंबर २०११) अलिबागला जायचं आहे. अगदी बोलण होत काय आणि मोजक्याच मित्र मंडळीकडून होकार मिळवून आठवड्याभरात सहलीला जायचं पक्क झालं.
ठरवल्याप्रमाणे (शेवटी भारतीय वेळेनुसारच आणि ह्या-त्या कारणांमुळे एक तास उशिराच) आम्ही सगळे सकाळी ७ च्या ठोक्याला गेट वे ऑफ इंडिया ला पोहचलो.
.साध्या बोटीच तिकीट काढून जिथून बोटी सुटतात तिथेच आजुबाजूच चित्र न्याहळत रांगेत उभे होतो. खरंच! सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात आपल्या मुंबापुरीच दार (गेट वे ऑफ इंडिया) आणि हॉटेल ताज किती सुंदर दिसत होत
ठरलेल्या वेळेतच आणि सह प्रवासाच्या "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल SSS " च्या गजरात आमची बोट गेटवेच्या किनाऱ्यापासून अलिप्त झाली. पुढे सरकत असताना आणि मागे वळून पाहताना काही क्षणातच मुंबईच चित्र धूसर होत होत दिसेनास झालं.

मग वेध लागले ते मांडावा किनारा गाठायचं. त्यात समुद्राची शांतता, खिन्न होवून बसलेले (अडकलेले) मोठी जहाज आम्हाला "खूप मज्जा करा!" असं सांगत असल्याचा भास आणि त्यात बेताल (ना सूर ना ताल) होवून गाणारे आमचे सहप्रवासी ह्या सगळ्याचा रसभंग करत होते.


ती जहाज नाहीशी होताच काही वेळातच पांढऱ्याशुभ्र समुद्र पक्ष्याचा थवा आमच्या बोटी मागून गिरक्या घेऊ लागला. काही प्रवासी (त्यात मी) त्याच्या कडचा खाऊ हवेत उडवून भरवण्याचा प्रयत्न करत होती. त्या पक्ष्याची तो खाऊ चोचीत पकडण्याची झुंबड चालू होती. खाण्याचा आणि भरवण्याचा हा खेळ बराच वेळ चालू होता. खेळ संपेपर्यंत आम्ही मांडावा बंदर कडे पोहचलो आणि पक्ष्यांनी आमचा निरोप घेतला (नक्कीच दुसऱ्या प्रवासांबरोबर खेळ खेळण्यासाठी.)

मांडवा बंदरावर उतरून आम्ही डुगडुग (सहाजण बसतील एवढी मोठी रिक्षा) पकडून डागडुग करत नागावच्या किनाऱ्यावर तासाभरातच पोहचलो. पोटपूजा करून माझे मित्र मंडळी पाण्यात मज्जा लुटण्यासाठी गेले आणि मी किनाऱ्यावर त्यांचे छायचित्र काढण्यात मौज करत होते.
शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे तशी वर्दळ किनाऱ्यावर होती. नेहमीप्रमाणे त्यातले काही जण पाण्याचा, काही जण क्रिकेट खेळण्याचा, तर काही जण घोडा गाडीत फिरण्याचा आस्वाद घेत होते.

समुद्र्याचा पाण्यात मज्जा लुटून, परत  ताजतवान होवून दुपारच्या जेवणात मस्त गरमा गरम भज्जी आणि वरण भातावर ताव  मारला.

जेवण झाल्यावर शतपावली करून डुगडूगीतून परत मांडावा बंदरावर सूर्यास्त होण्या आधी पोहचलो. आता पर्यंत बरेच सूर्यास्त पहिले त्यात अजून एक, डोळे दिपून टाकणारा सूर्यास्त!



एकीकडे सूर्य अस्ताला जात होता आणि दुसरीकडे चंद्र डोक्यावर होता. प्रदूषण विरहित वातावरणात चंद्र आणि तारे इतके विलक्षण दिसत होते ( त्या दिवशी पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र असल्यामुळे चंद्र जरा जास्तच मोठा असल्याचा भासत होता) हे सगळ दृश आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता.

हळू हळू पृथ्वी ने चंद्राला झाकोळायला सुरवात केली आणि चंद्राच्या त्या विविध कला क्षणाधार्त अनुभवल्या. ते पाहत असताना समुद्राच्या लाटांचा होणार संथ आवाज आणि निरभ्र काळोखी शांतता काही सांगत असल्याचा परत भास झाला.




असं, हे दिवसभराच आल्हाददायक आणि नयनरम्य निसर्गाच चित्र डोळ्यात साठवत आम्ही सगळेजण आपापल्या घरी परतलो......

------

विनया ज. शिर्सेकर